या नव नवल नयनोत्सवा

               दोन दिवसापूर्वी संगीत मानापमान बघितला आणि मनापासून आवडला. अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया वाचताना मनात आल की गेली पाच वर्ष एखाद्या कथेवर सिनेमा करण नक्कीच कठिण होत. जे सुबोध भावे आणि ज्योती देशपांडे ह्यांनी शिवधनुष्यासारख पेलल आहे.
     माझ्यासाठी मात्र हा सिनेमा आठवणीचा परिमळ ठरला. कारण नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर हे माझ्या आजीचे (माझ्या वडिलांची आई) सख्खे काका! आणि माझी आजी वडिलांच्या लहानपणी गेल्यामुळे तिच्या भावांकङे सांगलीला माझे वडिल लहानाचे मोठे झाले. मामांमध्ये मोठे दादा नंतर बापू, नाना, केशवराव आणि चिंतामणराव... आणि खाडिलकर वाङ्यात हे एकत्र कुटुंब नाती जपत रहात होते. नाट्याचार्याचा उल्लेख नेहमी काकासाहेब असाच होत असे. माझे वडिल बी.ए. झाल्यावर त्यांना सैन्यात जायच होत किंवा वकिल व्हायचं होत. उचीमुळे सैन्यात जमल नाही आणि काकासाहेबानी त्यांना गिरगावात नवाकाळ ऑफिसला बोलावून संध्याकाळ पेपरच्या संपादकपदाची जबाबदारी दिली. त्यामुळे ते काकासाहेबाच्या शेवटपर्यत त्यांच्या बरोबर राह्यले. त्यामुळे ते लोकमान्य टिळकाचे भक्त होते. खाडिलकराच्या सगळ्या नाटकाची पुस्तकं आमच्याकडे होती. दर दोन वर्षानी दादा त्यांची कव्हर बदलायचे. त्यानंतर त्यांनी परळच्या दामोदर हॉलला मॅनेजर म्हणून नोकरी धरली. आणि परळला हॉलच्या वरती आम्ही रहायला आलो आणि पुन्हा एकदा नाटकाशी संबंध आला.तिथ मी दोन वेळा मानापमान बघितलय... खूप लहान होते. जयमाला शिलेदार आणि राम मराठे, भार्गवराम आचरेकर, दाजी भाटवडेकर ह्या कलाकाराना मानापमानमध्ये बघितल्याच अंधुक आठवतय.
         माझ्या वडिलांचे बापूमामा आणि मामी म्हणजे सुप्रसिद्ध शास्त्रीय संगीत गायिका इंदिराबाई खाडिलकर!
ज्यांच्यामुळे संगीत नाटकाशी त्यातल्या सुप्रसिद्ध गायक/गायिकाना ऐकण्याची मला संधी मिळाली. कारण इंदिरा आजी आम्ही परळला रहात असल्यामुळे मध्यवर्ती म्हणून नेहमी आमच्याकडे उतरायच्या. आणि महत्वाचं म्हणजे त्यांच माझ्या आईशी सासू-सुनेपेक्षा मैत्रीच जवळच नात होत. त्यामुळे त्या प्रत्येक कार्यक्रमाला आईला बरोबर नेत आणि मी गाड्याबरोबर नाळा! लहान होते पण मी  बालगंधर्वाना, सरस्वतीबाई राणे,हिराबाई बडोदेकर अशा अनेक दिग्जाना आजींमुळे ऐकल आहे.मानापमान मधली मला मदन भासे हा, टकमक पाही, नयने लाजवित,खरा तो प्रेमा, श्री नवरी भासे ही अशी अनेक गाणी आजी गाताना ऐकल आहे. आता त्यांचा वारसा त्यांची नात वर्षा भावे अतिशय समर्थपणे चालवतेय.ही माझी चुलत बहिण कलांगणच्या माध्यमातून लहान मुलांना संगीत शिकवून सांगीतिक पिढ्या घडवतेय. खाडिलकर, कोल्ह्रटकारांकडून नाटकाचा वारसा घेतलेला दिलीप कोल्हटकर माझा आतेभाऊ आहे. ज्योति सुभाष माझी आते बहिण आहे. आता "आठवणींचा परिमळ" का दरवळला ते कळल असेल.
     आता थोङ सिनेमा बद्दल.
  1) सुमित राघवननी काम छान केलय पण आपल्या मनातली प्रतिमा पुसली जात नाही. मन तो व्हीलन म्हणून स्वीकारत नाही.पण तो अभिनेता म्हणून ग्रे शेड उत्तम साकारतो उदा. हॅम्लेट!
2) गाणी मुळ स्वर-सुरात आवडली असती.
3) संवादगीत आवडली..
4) सुबोध भावेनी हा प्रेरित आहे अस म्हटलय. आणि ते खर आहे.
5) मनात मात्र आल की जे अभिजात ते नव्या पिढीपर्यत पोचल का?
अवचिता परिमाळू। झुळकला अळूमाळू।
कान्ह्या ऐवेजी ह्या सिनेमानी मला माहेर भेटीचा आनंद झुळकला. आणि नयनोत्सव झाला.
                                  ललिता छेङा





Comments